gudhi-padwa

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करा गृहप्रवेश...!

नवीन घर बांधल्यावर त्यात राहायला जाण्यापूर्वी आपल्याला मुहूर्त पाहावा लागतो. भारतीय संस्कृतीत मुहूर्ताला खूप महत्त्व असून मुहूर्तावर नवीन व्यवसाय, नवीन खरेदी किंवा नवे घर, वाहन, सोने खरेदी करणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात. गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त आहेत, तर दीपावली पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. संपूर्ण वर्षभरातल्या या साडेतीन मुहूर्तांना भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना किंवा नवीन घरात प्रवेश करण्याच्या बाबतीत आपण भारतीय सामान्यत: शुभमुहूर्तांबद्दल विशेष आग्रही असतो. त्यामागे असा विश्वास आहे की, शुभ दिवशी गृहप्रवेश केल्याने भाग्य उजळते.

प्रथमच एखाद्या नवीन घरात प्रवेश केल्यावर एक गृहप्रवेश सोहळा पार पाडला जातो. वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ यांच्या मते, संपूर्ण कुटुंबासाठी हे महत्वाचे आहे. असे म्हणतात की, घर पाच घटकांपासून बनलेले आहे - सूर्य, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू आणि घरात या घटकांचे योग्य संतुलन आनंद, आरोग्य आणि समृद्धी आणते. असा विश्वास आहे की, एखाद्या शुभमुहूर्तावर घरात प्रवेश करणे जीवन सुकर बनवते. नवीन घरात गेल्यानंतर कुटुंबाला प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होईल. अशा मुहूर्तांना अनुकूल असणाऱ्या दिवसांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. या दिवसाचा प्रत्येक क्षण शुभ मानला जातो.

गृहप्रवेश करण्यापूर्वी मनोभावे कलशपूजन केले जाते. या विधीसाठी, तांब्याचे भांडे पाण्याने भरतात. त्यात नऊ प्रकारचे धान्य आणि एक नाणे ठेवण्यात येते. भांड्यावर एक नारळ ठेवला जातो. त्यासोबतच वेदशास्त्रसंपन्न गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चार करून पूजा करण्यात येते. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांचे आशीर्वाद लाभावेत, या दृष्टीनेही महत्त्व असल्याने कलशपूजन करून गृहप्रवेश केला जातो.

गृहप्रवेश करताना...

गृहप्रवेश त्यावेळेसच केला पाहिजे, जेव्हा नवीन घर शिफ्ट होण्यासाठी व राहायला तयार असेल. घराचे बांधकाम पूर्ण झालेले पाहिजे. ते पेंट केले पाहिजे. दरवाजे, खिडक्या आणि इतर फिटिंग्जसुद्धा पूर्ण असाव्यात, असे वास्तुतज्ज्ञ म्हणतात मुख्य प्रवेशद्वार, जे घरात समृद्धी आणि चांगल्या स्पंदनांचा प्रवेशबिंदू आहे, अशा उंबरठ्यावर काढलेले स्वस्तिक आणि माता लक्ष्मीची पाऊले शुभचिन्हे आहेत. आंब्याची हिरवीगार पाने आणि झेंडूच्या फुलांनी बनविलेले तोरण दरवाजावर लावले पाहिजे. जागा शुद्ध करण्यासाठी, नकारात्मक शक्तींना नष्ट करण्यासाठी सहसा होमहवन आयोजित केले जाते. गणेश पूजा, नवग्रह शांती, म्हणजे नऊ ग्रहांची उपासना आणि वास्तुपूजा केली जाते. या दिवशी आमंत्रित केलेल्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही भोजन द्यावे. हे सर्व विधी व कार्यक्रम पार पडल्यानंतर आपण नवीन घरात राहायला जाऊ शकता.

गृहप्रवेश करण्यापूर्वी या गोष्टी कराव्यात-

 • शुभमुहूर्त निवडा :

  सणासुदीच्या काळात अनेक शुभमुहूर्त येतात, जे गृहप्रवेशासाठी योग्य आहेत. गृहप्रवेशासाठी गुढीपाडवा हा सणसुद्धा खूप शुभ मानलो जातो.

 • बांधकाम आणि इतर कामे पूर्ण करा :

  जर बांधकाम चालू असेल तर आपल्या नवीन घरात जाणे टाळावे. जेव्हा घर पूर्णपणे तयार असेल तेव्हाच आपल्या नवीन घरात जा. गृहप्रवेश आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करण्याचा अर्थ दर्शवितो. एक नवीन घर जे प्रत्येक अर्थाने पूर्ण झाले आहे म्हणून फिटिंग्ज, पेंट इत्यादी सर्वकाही पूर्ण झाल्याचे आधी सुनिश्चित करा.

 • घर वास्तुशास्त्रानुसार आहे याची खात्री करा :

  आपले घर पूर्णपणे वास्तुशास्त्रास अनुरूप आहे याची खात्री करा. विशेषत: पूजा कक्ष (देवघर) आणि मुख्य प्रवेशद्वार.

गृहप्रवेश पूजेच्या दिवशी करावयाच्या गोष्टी-

 • प्रवेशद्वार सजवा :

  गृहप्रवेश पूजेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारास फुले, झेंडू व आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण लावावे. मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह किंवा देवी माता लक्ष्मीची पाऊले देखील रेखाटू शकता, कारण हे समृद्धी आणि भाग्य दर्शवते.

 • संपूर्ण घर स्वच्छ करा :

  पूजा करण्यापूर्वी, संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले आहे याची खात्री करा. आपल्या नवीन घरात सकारात्मकता आणि चांगली ऊर्जा आमंत्रित करेल. पूजा सुरू करण्यापूर्वी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ झाडून घ्या.

 • घर शुद्ध करा :

  गंगाजल किंवा गोमूत्र संपूर्ण घरभर शिंपडा. सर्वत्र पाणी शिंपडण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर करा. गंगाजल एक शुद्ध ऊर्जा आहे, जी घरातून नकारात्मक शक्ती काढून टाकते, असे मानले जाते.

 • रांगोळी रेखाटा :

  रांगोळी हे सण-उत्सवात उत्साह आणि आनंदाचे प्रतीक असून ती संपत्ती आणि समृद्धी यांना आकर्षित करते. गृहप्रवेश पूजा करण्यापूर्वी, प्रवेशद्वाराजवळ तांदळाचे पीठ आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रांगोळी रंगांचा वापर करा.