arch-developers-home-decor-tips-top-most-leading-construction-company-in-aurangabad

घराची सजावट कशी करावी, याविषयी सहजसोप्या टिप्स

आपलं घर सुंदर आणि नीटनेटकं असावं, असं प्रत्येकाला वाटतं. खरे तर, घर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. त्यामुळे घराच्या सजावटीचा विचार करताना दक्षता घ्यायला हवी. घरात आल्यावर शांत, प्रसन्न वाटावं, मन प्रफ़ुल्लित व्हावं, असं वाटत असेल सर्वप्रथम घराची सजावट उत्तम कशी होईल ते पाहा. घराचे प्रवेशद्वार, आतील भिंतींचा रंग, प्रकाश व्यवस्था, घरातील फर्निचर या गोष्टींचा विचार गृहसजावटीच्या वेळी प्रमुख ठरतो. आपल्या घराच्या सजावटीसाठी काही टिप्स...

 • हॉलमधील सजावट :

  घरातील हॉलमध्ये फर्निचर ठेवताना त्यात आटोपशीरपणा असावा. हॉलमध्ये फर्निचरची अनावश्यक गर्दी टाळावी. हॉलच्या साईझनुसार योग्य त्या आकारातील फर्निचर असावे. लिव्हिंग रूममध्ये फर्निचर नक्की कसे ठेवायचे, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. बऱ्याच घरात आपण पाहतो की एखाद्या भिंतीजवळ सोफा ठेवलेला असतो आणि त्याला जोडून एक-दोन खुर्च्याही असतात. पण फर्निचर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला थोडा अधिक विचार करावा लागेल. सोफा आणि खुर्च्या, तसेच पुस्तकांचा एखादा शेल्फ, त्याचबरोबर एखादे शोपिस ठेवून हॉलला वेगळा लूक देता येईल. यामुळे कलात्मकतेची जोड आपोआपच मिळेल.

 • घराची रंगसंगती :

  घराच्या भिंतींना रंग देताना सूर्यप्रकाशाचा मुद्दा महत्वाचा. घरात स्वच्छ प्रकाश राहील या दृष्टीने रंगांची निवड करावी. पण त्यातही हॉलमधील तीन भिंती फिक्या रंगाच्या ठेवून एकाच भिंतीला एखादा वेगळा गडद रंग दिला, तर तुमचा हॉल आणखी छान दिसेल. हा ट्रेंड आजकाल जोरात आहे.

 • आरामदायी व निवांत बेडरूम :

  आपल्या घराच्या बेडरूममध्ये आरामदायक फील येणं गरजेचं आहे. त्यामुळे बेडरूमला शक्यतो गडद रंग टाळावा. बेडरूमसाठी फिका रंग निवडावा. तुमच्या आवडत्या एखाद्या रंगाची शेड बेडरूमसाठी वापरता येईल. बेडरूमला रंग देताना भडकपणा टाळावा. रात्रीच्या वेळी शांततेचा अनुभव देणारे रंग निवडावेत.

 • घरातील शोभेच्या वस्तू :

  घरात ठेवलेली शोभेची झाडे सुंदरतेत आणखी भर घालतात. छोट्या कुंड्या किंवा सिरॅमिक पॉट्समध्ये लावलेली लहान रोपटी रूमची शोभा वाढवितात. बेडरूमच्या बाल्कनीत, खिडक्यांच्या शेजारी अशी रोपटी खूप सुंदर दिसतात. घरातील रोपट्यांमुळे निसर्गाच्या जवळ असल्याचा आभास निर्माण होतो. यात सध्या हँगिंग प्रकारातील रोपट्यांकडे लोकांचा कल अधिक आहे.

 • प्रवेशद्वाराजवळील नीटनेटकेपणा :

  घरात प्रवेश करताना मुख्य दाराजवळ बूट-चप्पल ठेवण्यासाठी एखादा शेल्फ ठेवावा. रांगोळीसाठी ठराविक जागा राखून ठेवली तर ते अधिक छान दिसते. घराच्या मुख्य दारात अस्ताव्यस्तपणा टाळावा. घरात येणाऱ्यांचे चित्त प्रसन्न राहील अशी व्यवस्था ठेवावी.